सोमवार, 1 अक्तूबर 2012

लोक रोमनमधून मराठी का लिहितात पण ती देवनागरी वर्णमालेच्या आधारानेच का लिहावी


टाईपरायटरचे युग असतांना टाइपिंग येणे हे निव्वळ एक कौशल्य होते, ते पोटापाण्यासाठी अर्थार्जनाचे साधन होते पण ज्ञानार्जनाचे नव्हते. मशीनच्या यांत्रिक मर्यादेमुळे टाइपराइटरची कळपाटी (की-बोर्ड) उल्टीपुल्टी होती पण तीच शिकून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कामचलाऊ टाइपिंग येण्यासाठी सुद्धा किमान महिनाभराची प्रॅक्टिस लागायची आणि ज्यांचे अडलेले नसेल ते त्या वाट्याला जात नसत. या यांत्रिक मर्यादा मराठी व भारतीय लिपींबाबत अधिक होत्या म्हणून मराठी टाईपरायटर शिकणे त्याहून किचकट होते -- एवढे जनरल नॉलेज सर्वांकडे आले.

टाईपरायटरचे काम करू शकणारे पण सोबत इतर असंख्य कामे करू शकणारे संगणक (कम्प्यूटर) नावाचे यंत्र आले आणि त्याने ज्ञानार्जन व द्रुतगति संदेशवाहनाचे रस्ते खुले केले. सुरुवातीपासून (सुमारे 1945) ते 1985 पर्यंत त्यावर फक्त रोमन वर्णमाला लिहिण्याची सोय होती आणि तीदेखील त्याच उलट्या-पुलट्या कळपाटीनुसार। पण आता ते शिकून घेण्यांत कित्येक मोठ्या संधी, प्रेस्टिज व कार्यक्षमता दडलेल्या होत्या आणि ज्यांना ज्यांना संगणक-सोइचे महत्व पटले त्यानी ती कळपाटी शिकून घेतली.

1985-1995 या काळात मराठीचा वावर संगणकावर सुरू झाला तो पण मराठी टाईपरायटरच्या किचकट कळपाटीसारखाच. त्यामुळे ज्यांनी ज्ञान, प्रेस्टिज, कार्यक्षमता इ साठी रोमनचा किचकट की-बोर्ड शिकून घेतला होता त्यांच्याकडे त्याहून किचकट असा मराठीचा की-बोर्ड शिकण्याचे धैर्य नव्हते, त्यातच 1995 मधे इंटरनेटचा वापर सुरू झाला तेंव्हा ते  मराठी इंटरनेटवर चालत नाही ही भलीमोठी  उणीव होतीच. यामुळे संगणकावर मराठी शिकण्याचा विचार मागे पडत राहीला, त्याऐवजी भाषा मराठी पण दृश्य अक्षरे रोमन हा पर्याय --म्हणजे tu kuthe jatos असे लोक लिहू लागले. आणि 2002 मधे एक दिवस त्यांना समजवण्यांत आलं की तुम्ही रोमनमधूनच  लिहा पण दृश्य अक्षरे मराठी  असतील अशी युक्ति तुम्हाला देतो -- म्हणजे तुम्ही tu kuthe jatos लिहा आणि संगणकाच्या पडद्यावर ते तू कुठे जातोस असं दिसेल. हे सर्व कधी नाइलाजाने तर कधी आनंदाने स्वीकारतांना संगणकावर मराठीच, पण किचकट उल्टापुल्टा की-बोर्ड न वापरता विनासायास शिकता येईल असा की-बोर्ड असू शकतो ही कल्पनाच फार लोकांना सुचली नाही -- कधी तिचा शोध घ्यावा असेही सुचले नाही. अशी पद्धत 1991 मधेच अस्तित्वांत आली होती पण देशाचं आणि मराठीच दुर्दैव की ती आहे याचा प्रचारच झाला नाही -- 1998 पासून ती मोफत आणि इंटरनेटवर टिकण्याची सोय झाली तरी प्रचार झाला नाही (कारण मोफत देणारी ऑपरेटिंग सिस्टम लीनक्स ही होती जी भारतात फारशी प्रचलित नव्हती)  आणि 2002 मधे ती विण्डोजवर मोफत आली म्हणजे खूप सुगम झाली  तरी ती आहे या बाबीचा प्रचार फारसा झाला नाही.


म्हणून जे लोक रोमनमधून मराठी लिहितात त्यांना सांगावेसे वाटते की बाबांनो, निरुपाय होता, माहिती नव्हती तेंव्हा रोमनचा आधर घेऊन का होइना मराठी भाषेत लिहित राहीलात -- कौतुक आहे तुमचं. पण आता आपल्या वर्णमालेवर आधारित अत्यंत सोपी व इंटरनेटवर टिकेल अशी पद्धत सुगमतेने उपलब्ध आहे. अगदी मामूली सरावाने ती तुम्हाला जमणार आहे - म्हणून - आतातरी आपली वर्णमाला रोमनच्या तुलनेत हरवू नये यासाठी थोडा विचार करा.
अर्थात शेवटी मला सुमारे 30 वर्षांपूर्वी एका IAS सहका-याचे शब्द आठवतात -- मी मुलांना कॉन्व्हेंटमधे घातले आहे म्हणजे त्यांना मराठी-हिंदी का आली नाही हा प्रश्नच नको -- आम्ही घरात त्यांच्याशी कटाक्षाने इंग्लिशच बोलतो --  त्यांना शिकून अमेरिकेतच जायचे आहे -- प्रगति, श्रीमंती सर्व काही तिथेच आहे -- इथे रहायचय कोणाला आणि कशाला .

अशांचा राग नाही पण आपली भाषा, लिपी आणि अत्यंत वैज्ञानिक अशी आपली वर्णमाला विसरली जाऊ नये, मृत होऊ नये, चिरंतन टिकावी, म्हणूनही मराठी लिहिताना ती देवनागरी  वर्णमालेच्या आधारानेच लिहावी
---------------------------------------------------------------------------------


कोई टिप्पणी नहीं: